Saturday 29 December 2012

स्त्री-भ्रूण हत्याच बरी!

चला, दिल्ली सामुहिक बलात्काराची बळी ठरलेली ती मुलगी अखेर गेली.

सुटलीच, नाही का?

ती ही सुटली अन आता तिचा मृत्यूच झालेला असल्यामुळे  कदाचित हा विषय मागे पडून तिचे दोषी असलेले ते काहीजण सुद्धा सुटतील. किंवा होईल त्यांना शिक्षा, ३-७ वर्षांच्या सक्त-मजुरीची. मग ते पुन्हा बाहेर येतील आणि कदाचित एखाद्या अशाच संध्याकाळी आपल्या लिंग-पिसाट वृत्तीसमोर शरणागती पत्करून आणखीन एका "अमानत" वर/मध्ये 'मोकळे' होतील.

मग आपण परत निषेध व्यक्त करू, निदर्शनं करू, सरकारला शिव्या घालू, सरकार हिजडं आहे अशी आपली मौलिक प्रतिक्रिया सुद्धा देऊ. मग काय, बहुधा, पुन्हा पहिले पाढे पंचावन्न!

हा बलात्कार इतका रानटी, निर्दयी, पाशवी होता म्हणून ह्याची निदान दखल तरी घेतली गेली, नाहीतर दर दिवशी शेकडो मुलींवर बलात्कार होतातचेत, पण आपला "आतला आवाज" काही जागा होत नव्हता.

खरंच, आज ना मला कुठले statistics मांडावेसे वाटतायत न कुठले दाखले द्यावेसे वाटतायत. माझा आजचा सूर खूप निराशावादी वाटेल तुम्हाला कदाचित, पण खरंच सांगते, विश्वास ठेवावा असं कारणंच उरलं नाहीये!

कारण हे सगळं घडत असताना, हे निषेध वगैरे व्यक्त होत असताना सुद्धा रोजच्या पेपरमध्ये किमान ५-६ बातम्या ह्याच प्रकाराताल्या होत्या. अल्पवयीन मुलीवर अत्याचार, विवाहितेवर अत्याचार, वृद्धेची विवस्त्र धिंड, लग्नाच्या आमिषाने बलात्कार, नवरा, दीर, भाऊ, बाप, सासरा, मित्र, सहकारी, अनोळखी, प्रतिष्ठित आणि इत्यादी ह्यांच्यापैकी नक्की कोण विश्वासार्ह आहे? खात्रीशीर रित्या नाही न सांगता येत? जर ही सुद्धा अधोगती नसेल, आणि अजूनही आपला आणि आपल्या civilization चा शेवट जवळ आलेला नसेल, तर आपण ह्या पुढे आणखी किती काय काय भोगणार आहोत ह्याची कल्पना सुद्धा करवत नाही.

स्त्री ची अब्रू तिच्या लैंगिक अवयवांवर मोजली जाते, ते तिने किती नीट प्रकारे लपवून/सांभाळून ठेवलेत ह्यावर जोखली जाते. पुरुषाला मग बहुधा अब्रू वगैरे संकल्पना लागू होत नसाव्यात. किंवा होत असल्यात तरी फार लक्ष देण्याइतक्या महत्वाच्या नसाव्यात त्या. पुरुषाला हवी त्या क्षणी, हवी त्या पद्धतीने आणि हवी तिथे त्याची लैंगिक भूक शमवण्याची परवानगी कोणी दिली? कोणीच नाही, पण ती नाकारली ही नाही ना कोणी! म्हणजेच, एका अर्थी, समाज पुरुषाला हवं तसं वागण्याची मोकळिक देतोचे ना? म्हणजेच, समाजाचा एका अर्थी पुरुषांच्या ह्या स्वैर वागणुकीला पाठींबा आहे, अप्रत्यक्षरीत्या असेल कदाचित!अर्थात, हे सगळे माझे interpretations आहेत, तुम्हाला अमान्य असतील हि कदाचित, पण असो.

आज हि घटना समोर आली म्हणून, नाहीतर आपणही "रोज मरे त्याला कोण रडे" करून गप्प बसलो होतोच की!

बलात्कार झाला कि त्याचा दोष स्त्रीच्या माथी मारून लोकं मोकळी होतात. पण एका so called सुसंस्कृत समाजात स्त्रीला तिला हवं तसं वागण्या-बोलण्याचे, हिंडण्या-फिरण्याची, पेहराव करण्याची मोकळिक नाहीये का? आणि हा तोच समाज आहे जो पुरुषाला ही सगळी मोकळिक देतो. भर रस्त्यावर पुरुषाने लिंग-प्रदर्शन मांडलं तरी लोकं हसून निघून जातात, उद्या स्त्रिया topless हिंडल्या तर अशीच प्रतिक्रिया देऊ शकेल का हा समाज? नाही ना? रस्त्यावरची प्रत्येक स्त्री हि आपली मालकी हक्क असलेली "स्थावर-जंगम मालमत्ता" आहे असा समज का करून घेतलाय पुरुषांनी?

सगळ्या पुरुषांना घालून-पाडून बोलायचा हेतू नाहीये माझा, पण स्त्रीला कमी लेखणार्या, तिच्यावर शारीरिक, मानसिक, भावनिक इत्यादी प्रकारची जबरदस्ती करणाऱ्या प्रत्येकाला उद्देशून हे नक्की लिहिलंय मी.


जन्माला आलेली मुलगी एक दिवसही सुरक्षित राहु शकेल ह्याची शाश्वती आहे कुठे? बलात्कार करायला ६ महिन्यांच्या मुली सुद्धा चालतात ह्या पशुंना. मग ह्या पेक्षा खरंच स्त्री-भ्रूण हत्या बरी नाही का? मी एक स्त्री आहे, त्यामुळे ह्या असल्या पाशवी प्रकाराचे पुरस्कर्ती नाहीये मी. पण जिथे जन्माला आल्यानंतर त्या जन्माची शिक्षा भोगावी लागणार असेल, तिथे जन्म न घेतलेला काय वाईट आहे?

अनामिके, तू सुटलीस, पण खरं सांगू? मुक्त होऊ नकोस, त्या प्रत्येकाला झपाट ज्याचा मेंदू कमरेखाली आहे!

--