Wednesday 9 February 2011

एकच वादा, अजित दादा!


"मिडिया वर बंदीच घातली पाहिजे...पत्रकारांना दंडुक्यांनी मारलं पाहिजे" इति माननीय उपमुख्यमंत्री श्रीयुत अजितदादा पवार.



दादांच्या ह्या विधानावर बहुतेक सर्व स्तरांतून अतिशय ज्वलंत प्रतिक्रिया आल्यात. म्हणजे सेनेच्या नीलम ताईंनी 'दादांचा संयम सुटला आहे' असं (मिडियाचीच मदत घेऊन) जाहीर केलं तर भाजप च्या मुंडे साहेबांनी 'मुस्कटदाबी हा त्यांचा ब्रान्ड' असं विधान केलं. मनसे च्या नांदगावकरांनी दादांना 'स्वत:ला वेळीच आवरण्याचा सल्ला दिलाय.



पण आमच्या विचारी मनाला असं वाटतंय कि उगाचच सगळे बिचाऱ्या दादांवर तोंडसुख घेतायत. दादांची बाजू समजून घेण्याचा कोणी निसटता प्रयत्न ही करत नाहीये. गेल्या काही महिन्यांमध्ये पत्रकार फारच हाताबाहेर गेलेत नाहीतरी. गेल्या ४-८ महिन्यात कधी नाही इतकी प्रकरणं शोधून काढलीयत कि बिचाऱ्या ह्या नेत्यांना श्वास घ्यायचीही उसंत होत नाहीये. आज काय 'आदर्श' तर उद्या काय 'राडिया'. पत्रकारांच्या जिभेला हाड नसतंच, पण थोडी दया तरी दाखवावी ना? (त्यांनी दया दाखवली कि मंत्री त्यांच्यावर खूप 'माया' करतील हेच लक्षात येत नाही त्यांच्या. काय तर म्हणे पत्रकारिता करणार!) अन मग ह्या प्रकरणांच्या भाऊगर्दीत बिच्चाऱ्या मंत्र्यांना कामं पूर्ण करायलाही वेळ होत नाही. मंत्री झाले तरी काय, शेवटी ते ही 'माणूस'च आहेत (???) ही वस्तुस्थिती मात्र 'मिडिया'वाले अगदी सोयीस्कररीत्या विसरतात! मग, रागाच्या भरात असं काहीतरी निसटत कधी कधी. पण म्हणून लगेच बिच्चाऱ्या दादांवर हल्लाबोल चढवायचा का?



राग आला कि आपण हक्काच्या माणसावरच चढतो...माफ करा, चिडतो ना? तस्सच दादा बोलले, इत काय म्हणून चिडायचं? त्या बोलण्यामागे दडलेली आपलेपणाची भावना समजून घ्यायला हवी ना? उद्या 'स्टोरी' च्या नावाखाली केलेली ही प्रकरणं पत्रकारांच्या जीवावर बेतू नयेत म्हणूनच दादांनी हा काळजीयुक्त सल्ला दिला असावा असं आम्हाला वाटतं.



दादांच्या मुळा-मुठे इतक्या स्वच्छ मनावर आणि जिव्हेवर उगाचच असे संशय घेऊ नयेत असं आमच्या (पत्रकार) मनाला वाटतंय!



दादा, प्रेमाचे सल्ले देतांना मात्र जरा स्वत:वर ताबा ठेवा बरं का! घरच्या कलहांबद्दल आम्ही तुम्हाला सांगायला नकोच. नाहीतर इच्छा नसताना तुमच्यावर "काका, मला वाचवा" म्हणायची वेळ यायची!



हा आमचा 'प्रेमाचा' सल्ला! ;)

3 comments:

  1. फुरश्यासारखी गिरकी घेऊन चावणारी ही भाषा कुठून जन्मली ही सांगायलाच नको.खूप छान आहे हा लेख.मला आवडला.सत्तेचा माज त्यांच्या चेहऱ्यावर दिसतो.ह्यांची सत्ता आल्यापासून माफियांचा सुळसुळाट अजून वाढला आहे.महाराष्ट्राला अधोगतीकडे नेण्याचे प्रामाणिक प्रयत्न ह्यांचे सुरु आहेत.अधिक काय बोलणे.
    जगदंबे नमोस्तुते ||

    ReplyDelete
  2. tu matra shalitun jode hanles bar ka, very nice.. agdi stya lihalas

    ReplyDelete
  3. View point
    पत्रकारांचा इगो आणि 'अटी लागू' माफी
    http://iopinionmaker.blogspot.com/2011/02/blog-post.html

    ReplyDelete